सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सामाजिक कार्यात घालवावे – सौ. साधना भोसले ; पंढरपुरात चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे जीवन सार्थकी लागते – वसंतनाना देशमुख ; प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रतिपादनपंढरपूर – “रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकिय, सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. रयत शिक्षण संस्थेने मानवी मूल्यांचा आदर्श जपला असून सामाजिक बांधिलकीचे संस्कार सेवकांना दिले आहेत. या संस्कारात वाढलेल्या प्राचार्य डॉ. अशोक भोईटे सरांनी आपले सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सामाजिक कार्यासाठी खर्ची घालावे. त्यांच्याकडे असलेल्या उत्तम प्रशासकीय कामाचा समाजातील गरजू, कष्टकरी व होतकरु विद्यार्थ्यांना फायदा व्हावा.” असे प्रतिपादन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. साधना भोसले यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख हे होते.

पुढे बोलताना सौ. भोसले म्हणाल्या की, “के.बी.पी. महाविद्यालयाच्या विकासात प्राचार्य भोईटे यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. प्रशासकिय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यास नोकरीच्या कालावधीत स्वत:कडे पाहण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. आयुष्यातील आवडीच्या अनेक क्षेत्रात काम करायला सवड मिळत नाही. तेंव्हा सेवानिवृत्तीचा काळ आशा अपेक्षांची पूर्तता करण्यात व्यथीत करावा. आपल्या गावाशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करावा.” 
...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले. या कार्यक्रमात गौरव समितीच्या वतीने प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. व मानपत्र देण्यात आले. ‘अशोकपर्व’ या गौरव ग्रंथाचे व ‘कर्मवीर’ या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  या सत्कारास उत्तर देताना डॉ. भोईटे म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यात कृतार्थ आहे. शैक्षणिक क्षेत्रात मला अनेक पदावर काम करण्यास मिळाले. रयत शिक्षण संस्थेने अतिशय कमी वयात सचिव पदाची जबाबदारी दिली. त्यामुळेच पुढे शिवाजी विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरुपद सांभाळता आले. कुटुंबात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्याने पंढरपुरात सेवानिवृत्त होण्यात वेगळा आनंद आहे. बडोदा, सातारा, कोल्हापूर व पंढरपूर या स्थळांना माझ्या आयुष्यात वेगळे स्थान आहे.”

हा सेवानिवृत्ती समारंभ बॅ.पी.जी.पाटील सभागृहात संपन्न झाला. झुम व युट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेणकुदळे, मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य डॉ. वंदना जाधव, प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, अधिष्ठात डॉ. विकास कदम आदी मान्यवरांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींच्या माध्यमातून मनोगते व्यक्त केली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे व सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली.   
अध्यक्षीय भाषणात वसंतनाना देशमुख म्हणाले की, “पंढरपूरच्या विठ्ठलनगरीत जो प्रशासकिय अधिकारी चांगले काम करतो. तोच पुढील आयुष्यात यशस्वी होतो. पंढरपूरचा विठ्ठल ही आध्यात्मिक शक्ती असून तो सर्वांचे कल्याण करतो. शैक्षणिक क्षेत्रात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत असून बदलाचे नवे वातावरण तयार झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेत शिक्षण घेतलेलेच विद्यार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी झालेले दिसतात. त्यामुळे पालकांनी जाहिरातींना बळी न पडता विद्यार्थांना मुलभूत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्राचार्य डॉ. भोईटे साहेबांनी अतिशय कमी कालावधीत आपल्या कार्याचा ठसा पंढरपुरात उमटविला आहे. त्यांनी पुढील आयुष्यात देखील पंढरपुराशी असलेले नाते दृढ ठेवावे.”

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमर कांबळे, डॉ. समाधान माने, श्री. सुरेश रायबान, श्री. अनंता जाधव, डॉ. दत्ता डांगे, प्रा. राजेंद्र मोरे, अभिजीत जाधव आदींनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. सुखदेव शिंदे यांनी मानले.