पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी त्यांनी डॉक्टरांकडून माहितीही घेतली.
दरम्यान, आमदार भालके हे सिरियस असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांकडून उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
आमदार भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
शरद पवार यांनी आमदार भालके यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी भेट घेतली. परंतु, भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून आम्ही आमच्या परीने त्यांना वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. असेही डॉक्टरांनी सांगितले.
आज सकाळपासुनच आमदार भारतनाना भालके यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अफवा पसरत होत्या. याबाबत आमदार भारतनाना भालके यांच्या समर्थकातून संताप व्यक्त होत आहे दरम्यान भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. यानंतर पुन्हा भालके यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हाती आली. परंतु रूबी हॉस्पिटल परिसरात आमदार भालके यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गर्दी वाढु लागल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली.
आमदार भारतनाना भालके यांच्या समर्थकांकडून व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
0 Comments