Pandharpur Live ; कार्तिकी वारी: धावूनी ये विठ्ठला सत्वरी...

 


इतिहासात प्रथमच आषाढी वारीप्रमाणेच भुवैकुंठ पंढरी नगरी ऐन कार्तिकी वारीतही वारकरी भाविकांविना सुनी सुनी भासत आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो विठ्ठलभक्तांच्या मेळ्याने फुलणारी पंढरी सध्या मात्र ओस पडलेली आढळुन येतेय. टाळमृदंगाच्या निनादात आणि विठुनामाच्या जयघोषाणे दुमदुमणारी विठुरायाची ही नगरी आज स्तब्ध झालीय. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाने संचारबंदी घोषीत केल्यामुळे पंढरीत सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागलाय. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असा भक्तांचा आणि देवाधिदेव पांडुरंगाच्या वारीचा भव्य सुखसोहळा रद्द झालाय... प्रतिकात्मक कार्तिकी वारी साजरी करण्यासाठी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठुरायाचा दरबार रंगीबेरंगी फुलांनी सजवला गेलाय, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केलीय परंतु वारकरी भाविकाविना देवाचे पश्‍चिमद्वार, उत्तरद्वार व महाद्वारासह संपुर्ण मंदिर परिसर शांत आहे. 

ना टाळ मृदंगाचा निनाद, ना विठुनामाचा जयघोष, ना अबीर बुक्क्यांची उधळण ठायी ठायी जाणवतेय वारकरी भाविकांची अनुपस्थिती. हे सर्व चित्रं पाहुन खरंच म्हणावंसं वाटतं, ‘‘धावुनी ये विठ्ठला सत्वरी... सुनी सुनी वाटे तुझी पंढरी’’ हे पंढरीनाथा, करुणाकारा, अखंड विश्‍वाच्या दातारा लवकरात लवकर कोरोनाचे हे संकट घालव आणि अखंड मानवजातीला दिलासा दे!

Post a Comment

0 Comments