राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ... कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

Pandharpur Live Online: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीनं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. .

...............

 

Advet.  

...............

रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील ऑफिसातील फोन नंबरवर फोन करून त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे.

जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता.वाळवा, जि. सांगली) असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

धायरी येथील गारमाळ परिसरातील ब्रह्मगिरी आर्केडमध्ये रूपारी चाकणकर यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहायक राजदीप राजेंद्र कठाळे (वय-25, रा. धायरी) यांनी पोलिसांना दिली. 

त्यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपीविरोधात भादंवि कलम 507 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी धमकीचा फोन आला. आरोपीनं जयंत रामचंद्र पाटील बोलत असल्याचं सांगून ही धमकी दिली.

'मला रूपालीबाई चाकणकर यांचा मोबाइल नंबर दे, ती काय करते ते बघतोच, असंही आरोपी म्हणाला. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली येथून बोलत असल्याचं आरोपीन सांगितलं. रूपाली चाकणकर यांचा नंबर न दिल्यानं आरोपी आणखी चिडला. तो म्हणाला, तुला नंबर द्यायचा आहे की नाही. मी कोण आहे तुला माहिती नाही. तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलीस बोलवायचे असतील तर बोलव. मी घाबरत नाही. रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देईन, अशा अर्वाच्च भाषेत आरोपीनं धमकी दिल्याचं फिर्यादी राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, याआधीही रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लिल कमेंट्स केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर आरोपी वारंवार अश्लिल कमेंट्स करत होते. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Post a Comment

0 Comments