पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने स्वागत

 पंढरपूर: प्रतिनिधी 

कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेली अभियांत्रिकीची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन स्वागत करण्यात आले, असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन संवाद साधताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सिंहगड संस्थेतील मागील यशाचा आलेख विद्यार्थ्यांना सांगितला. सिंहगड संस्थेत जे विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत अशा माजी विद्यार्थ्यांचा विकासा आढावा दिला. संस्थेवर, शाखेवर तसेच अभ्यासक्रमावर विश्वास दाखवून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरचे स्वप्न पुर्ण करावे असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.


यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, सिंहगड महाविद्यालयात विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाची माहिती सहभागी विद्यार्थ्यांना दिली. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक व विद्यार्थी यामध्ये जे गुरू शिष्याचे नाते असते त्या नात्यामधील संभाषण व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गजन्य रोगराईमुळे ऑनलाईन लेक्चर घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना गुगल मिट, युट्यूब लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर देण्यात येणार आहेत. याशिवाय ऑनलाईन लेक्चर मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर प्रसंगी नेटवर्क प्राॅब्लेम निर्माण झाल्यास त्यांना युट्यूब वरील लिंकच्या माध्यमातून लेक्चर समजुन घेता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर संबंधित तसेच इतर काही अडचण आल्यास संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधल्यास विद्यार्थ्यांची अडचण सोडविण्यात येणार असल्याची माहिती प्रा. अनिल निकम यांनी ऑनलाईन सहभागी विद्यार्थ्यांना दिली.


या ऑनलाईन प्रथम वर्ष स्वागत समारंभ प्रसंगी सिंहगड महाविद्यालयात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
हा ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अमोल नवले,अभिजित पाटणे यांनी परिश्रम घेतले.

Post a comment

0 Comments