कोरोनाच्या भीतीने गर्भश्रीमंतांचे परदेशात पलायन... खासगी विमानांसाठी लाखोंचा खर्च!

 
Pandharpur Live Online:

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णालयात बेड, ऑक्सीजन आणि औषधोपचारांची कमतरता असल्याच्या बातम्या येत आहेत. देशातील या परिस्थितीमुळे अनेक गर्भश्रीमंत लोक देशातून विदेशात पलायन करत आहेत. त्यासाठी खासगी विमानांवर ते लाखोंचा खर्च करत आहेत.

देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी खासगी जेटसाठी पैसे मोजण्याची तयारी असलेले परदेशात मोठ्या संख्येने जात असल्याची माहिती दिल्लीतील एका खासगी जेट फर्म क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन मेहरा यांनी दिली. देशातील आरोग्य सेवेबाबत तसेच बेड, ऑक्सीजन यांच्या कमतरतेमुळे अनेकांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी विमानांचे बुकींग वाढल्याचेही मेहरा यांनी सांगितले.

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते. आता मालदीवमध्येही हिंदुस्थानींच्या प्रवेशाला तात्पुरती बंदी करण्यात आली आहे. तसेच हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने ब्रिटन, कॅनडा, युएई, हाँगकाँग या देशांनीही हिंदुस्थानींच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. तसेच काही देशांनी कोरोनाबाधित देशातून येणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहे. तरीही ब्रिटन आणि दुबईमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या जास्त असल्याचे मेहरा यांनी सांगितले.

दिल्ली ते दुबई प्रवासासाठी खासगी विमान 15 लाख रुपये घेत आहेत. तसेच परदेशातून परतीचे शुल्कही आकारले जात आहेत. त्यामुळे देशातील परिस्थिती बघता एवढे पैसे मोजण्याची तयारी असलेले श्रीमंत दुबई, ब्रिटन किंवा युरोपीय देशात जात आहेत.

Post a Comment

0 Comments