बोंबला! दारू कोरोनावरील उपाय... डॉक्टरनेच केला खळबळजनक दावा!

 


Pandharpur Live Online: एकीकडे कोरोनाच्या उद्रेकामुळे नागरिकांसह, शासनही हवालदिल झालंय तर दुसरीकडे कोरोना संबंधित विविध अफवा आणि चर्चा प्रशासनासाठी डोकेदुखी बनलीय. अशीच एक चर्चा नगर जिल्ह्यातील एका डॉक्टरच्या खळबळजनक दाव्यामुळं चांगलीच रंगलीय. दारू हा कोरोनावरील उपाय आहे. दारूच्या सहाय्याने पन्नासहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे केल्याचा दावा बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोमवारी सोशल मीडियावर बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांच्या नावाने एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. 'दारूचा काढा' कोरोना बाधितांना दिल्यास रुग्ण बरा होतो. तसेच याला पुष्टी देताना काही रुग्णांना आलेला अनुभव त्या व्हायरल पाेस्टमध्ये कथन करण्यात आला आहे. याचबरोबर दारूची मात्रा कशी उपयुक्त ठरते हे समजून सांगण्यासाठी काही संशोधनाचा दाखलाही देण्यात आला आहे.

मी दारूचे समर्थन करत नाही, परंतु आजपर्यंत बेड न मिळालेल्या ५० कोरोनाबाधित रुग्णांना त्या आधारे बरे केले आहे. आजही काही उपचार घेत आहेत. यामध्ये माझ्या अनुभवानुसार सत्यता आढळून आली असून पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकतो.

-डॉ. अरुण भिसे,

बोधेगाव

.....................

संबंधित डॉक्टरांना शेवगाव तहसील कार्यालयात मंगळवारी बोलाविले आहे. त्यांनीच ती पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे का? याची खात्री करून पुढील कारवाई करता येईल.

-अर्चना पागिरे,

तहसीलदार, शेवगाव

...................

सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टबद्दल माहिती मिळताच मी ती पोस्ट वाचून खात्री करण्यासाठी बोधेगाव येथे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ती मात्रा दिल्यावर रुग्णांना फरक पडल्याचे सांगितले. मात्र त्यांना रुग्णांची दिशाभूल करू नका. अशा पोस्ट व्हायरल करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा जिल्हा चिकित्सक यांचा आहे.

डॉ. सलमा हिराणी,

तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव

Post a Comment

0 Comments