अफगाणिस्थानमधील 'या' भौगोलिक, अनमोल खजिन्यावर आहे चीनचा डोळा! तालिबानच्या अफगाणिस्तानवरील नियंत्रणाचा सर्वाधिक फायदा होणार चीनला !!


 
Pandharpur Live Online: अफगाणिस्तानवर ( Afghanistan) सर्व जगाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तालिबान (Taliban)तिथे शरीयतनुसार राज्यकारभार करणार हेदेखील निश्चित आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या उपस्थित शांततेत आयुष्य जगणाऱ्या आणि विकासाच्या दिशेने पावले टाकणाऱ्या अफगाणिस्तानमधील राज्यकारभारात खूपच आमूलाग्र बदल होणार आहे. या सर्व बदलांचा आणि तालिबानच्या अफगाणिस्तानवरील नियंत्रणाचा सर्वाधिक फायदा पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन देशांना होणार आहे. 

 

कारण या दोन्ही देशांनी तालिबानला पुन्हा सत्तेत येण्यासाठी छुप्या पद्धतीने भरपूर मदत केली आहे. त्याचबरोबर जगातील इतर देशांच्या तुलनेत चीन आणि पाकिस्तानने उघडपणे तालिबानला समर्थन दिले आहे आणि सहकार्य करण्याचे धोरण ठेवले आहे. याचे खूप मोठे व्यूहरचनात्मक (Strategic implications)परिणाम आहेत. अफगाण लोकांना स्वतंत्र्यरित्या आपले भविष्य ठरवावे याचा आम्ही सन्मान करतो आणि अफगाणिस्तानबरोबर मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध विकसित करू इच्छितो असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (Chinese Foreign ministry) प्रवक्त्याने म्हटले आहे, तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी देखील तालिबानने अफगाणिस्तानातील मानसिक गुलामगिरीची बंधने झुगारली आहेत, असे म्हटले आहे. यातून चीन आणि पाकिस्तान हे तालिबान्यांच्या मदतीने अफगाणिस्तानात हातपाय पसरणार हे स्पष्ट आहे. (Afghanistan: Taliban's control over Afghanistan gives China a huge advantage, Chinese eye on Afghan Mines & natural resources)

अफगाणिस्तानचे भौगोलिक महत्त्व (Afghanistan's geographic importance)

भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे अत्यंत मोठे महत्त्व आहे. आशियात आणि आखातात लष्करीदृष्ट्या अफगाणिस्तानचे भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा भाग मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि आखातीदेश यांना जोडतो. याचबरोबर जरी अफगाणिस्तानात अनिश्चितता असली, राजकीय अराजकता असली तरी तिथे मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. ही खनिज संपत्तीदेखील जगातील ताकदवान देशांना तिकडे आकर्षित करते. रशिया, अमेरिकेनंतर आता चीन पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानात आपले बस्तान बसवू इच्छितो.अफगाणिस्तानातील खजिना आणि चीन (Natural resources in Afghanistan & China)

चीनचे लक्ष अफगाणिस्तानातील खनिज संपत्तीवर आहे. तालिबान हा पूर्णपणे पाकिस्तानच्या मदतीवर उभा आहे. तर पाकिस्तानला चीनची मदत आणि समर्थन दोन्हीही आहे. त्यामुळेच तालिबान चीनला झुकते माप देईल. चीनने आधीच अफगाणिस्तानातील खाणउद्योगात एक मोठे कंत्राट मिळवले आहे. सध्या चीन अफगाणिस्तानातील सर्वात मोठा परकी गुंतवणुकदार आहे. चायना मेटलर्जिकल ग्रुप कॉर्प, झीजिन मायनिंग कंपनी, जियांग्जी कॉपर कॉर्पोरेशन यांनी अफगाणिस्तानात ३.५ अब्ज डॉलरचे कंत्राट मिळवले आहे. हे कंत्राट जगातील सर्वात मोठी तांब्याची खाण असलेल्या आयनाक कॉपर फील्डसाठी मिळालेले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानात ४०० अब्ज डॉलरचे लोहखनिज, २७० अब्ज डॉलरचे तांबे, २५ अब्ज डॉलरचे सोने, ५० अब्ज डॉलरचे कोबाल्टची खनिजसंपत्ती आहे. त्याचबरोबर अफगानिस्तानात जवळपास १६० कोटी बॅरल कच्चे तेल, १५ हजार ट्रिलियन क्युबिक फूटपेक्षा जास्त नैसर्गिक वायूचे साठेदेखील आहेत. याशिवाय दुर्मिळ धातूंचादेखील मोठा साठा आहे. या धातूंचा वापर आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात केला जातो.


चीनच्या बीआरआय प्रोजेक्टसाठीचा विस्तार (China's ambitious BRI project)

बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्ह (BRI) हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे चीन पायाभूत सुविधांचे जाळे आशियाभर पसरू इच्छितो. यातून जगभर आपले वर्चस्व वाढवण्याचा आणि मोठे आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याची चीनची योजना आहे. जुन्या रेशीम मार्गाच्या म्हणजे सील्क रोडच्या धरतीवर चीन नवी व्यवस्था निर्माण करू इच्छितो. चीनच्या बीआरआय प्रोजेक्टला अफगाणिस्तानमुळे हातपाय पसरला मोठी संधी मिळणार आहे. कारण पाकिस्तानपर्यत चीनने रस्ते आणि विविध योजना आधीच पोचवल्या आहेत. आता अफगाणिस्तानही हाती आल्यास चीन इराणमार्गे थेट आखातीदेशांमध्ये पोचेल. बीआरआय प्रकल्पावर चीन मोठी गुंतवणुक करतो आहे. चायना डेव्हलपमेंट बॅंक ९०० अब्ज डॉलर आणि एशिया इंफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंक १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करते आहे. याशिवाय बीआरआय प्रकल्पाअंतर्गत चीन ६० देशांमध्ये एकूण ९०० पेक्षा जास्त प्रकल्पांचे निर्माण करणार आहे. 


अफगाणिस्तानातून अमेरिका गेल्यामुळे आणि तालिबानचा अफगाणिस्तानवर कब्जा झाल्यामुळे चीनला वातावरण अनूकूल झाले आहे. चीन आता अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक करेल. याशिवाय चीन ताजिकिस्तानमधून अफगाणिस्तानापर्यत रेल्वेमार्गदेखील जोडतो आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की मध्य आशियात आगामी काळात चीनचा प्रभाव प्रचंड वाढणार आहे आणि त्यातून भारतासाठी खूप मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

Post a Comment

0 Comments