आम्ही जगाला सांगू इच्छितो की, अफगाणिस्तानात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही! महिला आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील!- तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद 20 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

 

 Pandharpur Live Online: 
20 वर्षांच्या लढाईनंतर आम्ही अफगाणिस्तानातून परदेशी सैन्याला पळवून लावलं, असं तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांनी म्हटलंय.

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबुलमध्ये तालिबननं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद 20 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले.

"अफगाणिस्तान आता कुठल्याही संघर्षाचं युद्धक्षेत्र होऊ द्यायचं नाहीय," असं म्हणत जबीबुल्लाह मुजाहीद म्हणाले, "आम्हाला देशाअंतर्गत किंवा देशाबाहेरील कुणीही शत्रू नको."काबुलमध्ये झालेल्या गोंधळाबाबत ते म्हणाले, "आम्हाला काबुलमध्ये कुठलाही गदारोळ होऊ द्यायचा नव्हता. काबुलचे सर्व दरवाजे बंद करण्याची आमची योजना होती, जेणेकरून सत्तांतराची प्रक्रिया सहजरित्या पार पडू शकली असती. मात्र, दुर्दैवानं, आधीचं सरकार अकार्यक्षम होतं. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी कुठल्याच सुरक्षेची हमी दिली नाही. त्यामुळे आम्हाला काबुलमध्ये घुसून नागरिकांची सुरक्षा पाहावी लागली."महिलांच्या हक्कांबाबत तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांना विचारण्यात आलं तेव्हा 'शरियाचं पालन करून महिलांना शिक्षण आणि नोकरी करता येईल' असं स्पष्ट केलं.

तसंच आम्ही कुणाशीही बदला घेणार नाही असंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय.जबीबुल्लाह मुजाहीद यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • ज्यांनी आमच्या विरोधात लढा दिला, त्यांना आम्ही क्षमा केली आहे. वैमनस्य संपले आहे.
  • आंतरराष्ट्रीय जगताला सांगू इच्छितो की, कुणालाही त्रास दिला जाणार नाही
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला कुणालाच अडचण नाहीय
  • शरियानुसार महिलांना जे अधिकार आहेत, त्या अधिकारांच्या आम्ही बाजूनं आहोत महिला आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील.
  • आम्ही जगाला सांगू इच्छितो की, अफगाणिस्तानात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही.

दरम्यान, शेवटी जबीबुल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं की, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू.

"आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर देशात कुठले कायदे असतील ते देशासमोर सादर करू. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी गंभीरपणे काम करत आहोत. पूर्ण झाल्यावर सरकारची घोषणा करू. सर्व सीमा आमच्या ताब्यात आहेत," असंही जबीबुल्लाह मुजाहिद म्हणाले.

Post a Comment

0 Comments