Pune Crime |पाणीपुरीवरून सुरू झाला वाद; पती डबा न घेताच कामावर गेला... संतापाच्या भरात पत्नीनं उचलल टोकाचं पाऊल!

Pandharpur Live Online: पती-पत्नीत पाणीपुरी विचारता आणल्यावरून वाद झाला, रागाच्या भरात पती डबा न घेताच कामावर गेला आणि यानंतर संतापलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन पतीला अटक केली आहे. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय-33) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांचा विवाह 2019 मध्ये प्रतिक्षासोबत (मुळ रा. बीड) झाला होता.

त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून तो पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर प्रतिक्षा सासरी राहत होती. यावरून त्यांच्यात वाद होत होते.
काही दिवसांपूर्वीच गहिनाथ याने पत्नीला पुण्यात आणले होते. ते दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते.

घटनेच्या दोन दिवसापूर्वी गहिनीनाथ याने ऑफिसवरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणले होते. त्यावेळी मला न विचारता पाणीपरी आणल्याच्या रागातून प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

पाणीपुरी आणण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. यानंतर पतीने कामावर जाताना डबा नेण्यास नकार दिला. यातूनच प्रतिक्षाने विषारी औषध प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, शनिवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास प्रतिक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रतिक्षाचे वडील प्रकाश प्रभाकर पिसे (वय-55 रा. सरकारी दवाखान्यामागे, बीड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गहिनीनाथ अंबादास सरवदे याच्या विरोधात तक्रार दिली.
प्रकाश पिसे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती गहिनीनाथ सरवदे याला अटक केली आहे.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments