हातभट्टी तस्कराकडून बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न


 

Pandharpur Live Online: अवैध हातभट्टी दारूची तस्करी करणाऱयांनी नाकाबंदी करणाऱया पोलिसांच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

राम देवीदास जाधव (वय 40), मुकुंद श्रीकुंभ जाधव (वय 25), अजय शिवाजी राठोड (सर्व रा. बक्षीहिप्परगा तांडा, ता. उत्तर सोलापूर) व अनोळखी एक अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर, राम जाधव व मुकुंद जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल धनराज वेवाण यांनी फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी बक्षीहिप्परगा तांडा येथील हातभट्टी दारूच्या टय़ूब घेऊन बोलेरो जीप बार्शीकडे येत असल्याचे धनराज वेवाण यांना सांगितले. वेवाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी तातडीने पानगाव (ता. बार्शी) येथे नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो गाडी सोलापूरच्या दिशेने भरधाव गेली. थांबण्याचा इशारा करूनही बोलेरो गाडी न थांबल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. 


बार्शी पोस्ट चौकापर्यंत आल्यानंतर या चालकाने जीप कुर्डूवाडी रोडने घेऊन कुर्डूवाडी बायपास चौकातून बार्शी-लातूर बायपासला वळविली. त्यामुळे पाठलाग करणाऱया पोलिसांनी कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदारांना फोन करून रोडवर नाकाबंदी करण्यास सांगितले. पोलीस अंमलदार शेलार यांनी ठाण्यात हजर असणाऱया पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, सुरेश बिरकले, शिंदे, महेश डोंगरे, अप्पा लोहार यांच्या मदतीने बॅरिकेड्स व ठाणे अंमलदार शेलार यांची स्विफ्ट कार आडवी लावून चालकास थांबण्याचा इशारा केला; पण बोलेरो चालकाने थांबविण्यासाठी उभे असलेल्या शेलार यांच्याच अंगावर जीप घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.शेलार यांनी समयसूचकता बाळगून बाजूला उडी मारून जीव वाचविला. मात्र, बोलेरो चालकाने स्विफ्ट कारला धडक दिली. या धडकेनंतर गाडी रस्त्याच्या कडेला अडकून राहिल्याने गाडीतील चालक व इतर तिघे अंधाराचा फायदा घेत उतरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. मात्र, अन्य दोघे फरार झाले. पोलिसांनी बोलेरोमधून 60 हजार 500 रुपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments