Pandharpur Live Online: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. भाषणाच्या सुरुवातील नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल' असं मोदींनी म्हटलं आहे.
पुढचा 25 वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे
'विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील 54 कोटी हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. येथून पुढच्या 25 वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जाईल' असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!' असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. तसेच स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना फाळणीचे दु:ख देशवासियांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आमच्या सरकारने 14 ऑगस्ट हा विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल असं म्हटलं आहे.
७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार
नरेंद्र मोदींनी यावेळी भाषण करताना आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी तसंच योजनांमुळे मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी गरिबांसाठी मोफत तांदूळ, भविष्यातील वाटचाल, शिक्षण योजना अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. मुख्यत्वे मोदींनी यावेळी ७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार आहे अशी घोषणा केली.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला दिलेल्या भाषणात ७५ वंदे भारत ट्रेन ७५ आठवड्यांच्या आत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार आहे अशी घोषणा केली आहे.
देशाने संकल्प केला आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांत ७५ वंदे भारत गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यात जोडल्या जातील. आज ज्या वेगाने देशात नवीन विमानतळे बांधली जात आहेत, दुर्गम भागांना जोडणारी विमानसेवेची योजना देखील अभूतपूर्व आहे. आधुनिक सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात भारताने एक समग्र दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
0 Comments