उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार पालखी मार्गाचे भूमिपूजन

 Pandharpur Live: 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या (NH-965G), तीन विभागांचे भूमिपूजन करणार आहेत‌.

हे प्रकल्प पंढरपूरला भाविकांची ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात येत आहेत.या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला 'पालखी' साठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्यामुळे भाविकांना विनाअडथळा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होईल.

दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे २२१ किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे १३० किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे ६६९० कोटी रुपये आणि सुमारे ४४०० कोटी रुपये इतका आहे.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पंढरपूरचा विविध ठिकाणांहून संपर्क वाढविण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील २२३ किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित करतील, ज्याची अंदाजे किंमत ११८० कोटी रु. पेक्षा जास्त आहे. या प्रकल्पांमध्ये म्हसवड - पिलीव - पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी - पंढरपूर (NH 965C), पंढरपूर - सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर - मंगळवेढा - NH 5-A या रस्त्यांचा समावेश आहे.

 या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे दुपारी 12 वाजता पंढरपूरमध्ये येणार आहेत. सर्वात आधी ते विठ्ठल आणि रूक्मिणीचं दर्शन घेतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन करून जनतेशी संवाद साधणार आहेत. या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments