कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी स्टेडियम करावे लागले रिकामे , IAS अधिकाऱ्यासाठी खेळाडूंवर अन्याय!खेळाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. तसेच खेळाचे साहित्य, मैदाने उपलब्ध करुन दिले जातात. मात्र राजधानी दिल्लीमध्ये आयएएस अधिकाऱ्याला कुत्र्यासोबत फिरण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना स्टेडियम सोडण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

दिल्ली शहरातील त्यागराज स्डेडियम राज्य सरकारच्या मालकीचे आहे. या स्टेडियमची देखभाल सरकारकडून केली जाते. २०१० कॉमनवेल्थ गेम्ससाठी हे मैदान तयार करण्यात आले होते. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे खेळाडू सरावासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या स्टेडियमवर सायंकाळी सात वाजल्यानंतर दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिन संजीव खिरवार आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला येतात. त्यामुळे या खेळाडूंना वेळेच्या आधीच म्हणजेच संध्याकाळी सात वाजता खेळ आणि सराव बंद करुन मैदान सोडण्यास भाग पाडण्यात येत आहे. एका आएएस अधिकाऱ्याला कुत्र्यासोबत फिरायला यायचं असल्यामुळे सर्वच खेळाडूंना मैदान खाली करायला सांगितले जातेय. या प्रकारामुळे रोष व्यक्त केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.


विशेष म्हणजे हे स्टेडियम दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील आहे. या प्रकारामुळे प्रशिक्षण घेणारे खेळाडू तसेच त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत विचारणा करण्यासाठी आयएएस अधिकारी खिरवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी मैदानावर कुत्र्याला घेऊन फिरायला जात असल्याचे मान्य केले आहे. मात्र माझ्या फिरण्यामुळे कोणत्याही खेळाडूच्या सरावास अडचण येत नाही, असे म्हणत त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.याबाबत बोलताना खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही विजेच्या दिव्यांच्या मदतीने रात्री ८.३० वाजेपर्यंत खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचो. मात्र आता एका शासकीय अधिकाऱ्याला आपल्या कुत्र्याला घेऊन फिरता यावे यासाठी आम्हाला सायंकाळी ७ वाजताच मैदान रिकामे करायला सांगितले जात आहे. यामुळे आमचे प्रशिक्षण आणि खेळाडूंचा सराव विस्कळीत झाला आहे." असे एका प्रशिक्षकाने सांगितले

Post a Comment

0 Comments