आंतरराष्ट्रीय योग शिबिरात स्वेरीचा सहभागआंतरराष्ट्रीय योग शिबिरात स्वेरीचा सहभाग

पंढरपूर- ‘पतंजली योग व आयुष मंत्रालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पांडुरंग परिवार यांच्या सहकार्याने पंढरपूर मधील रेल्वे ग्राउंडवर ‘आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या योग शिबिरात सहभाग नोंदविला. 

          तुळशीला पाणी घालून आणि विठ्ठलाची पूजा करून सकाळी सात वाजता या योग शिबिराचे औपचारीक उदघाटन करण्यात आले. प्रास्तविकात पतंजली महाराष्ट्र राज्य प्रभारी सौ. सुधाताई आऴ्ळीमोरे यांनी निरोगी राहण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांची नितांत गरज असल्याचे सांगून त्याबाबत सविस्तर माहिती दिली. पुढे त्या म्हणाल्या कि, ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्त भारतामध्ये ७५ ठिकाणांची निवड करण्यात आली होती तर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि पंढरपूर या तीन ठिकाणांची या योग शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. प्राणायम हे आयुष्य सहज जगायला शिकवते. आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक ताण तणाव वाढतो, अशावेळी मन:शांती आणि समाधानासाठी योग साधनेची अत्यंत गरज आहे. योगामुळे मन:शांती लागते.’ विधान परिषदेचे माजी आमदार व पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी  पंढरपूरमध्ये हे योग शिबिर आयोजित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुभाष जाधव यांच्या सहकार्याने पदवी इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग, बी.फार्मसी व डी. फार्मसी या चारही महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या योग शिबिरात सहभाग घेतला होता. सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम  साधारण आठ वाजेपर्यंत चालला.


 यामध्ये तज्ञ प्रशिक्षकांनी सर्व सहभागींकडून विविध योग प्रकार करवून घेतले. यात वज्रासन, ताडासन, सर्वांगासन,पादहस्तासन, त्रिकोणासन, पायाचे सूक्ष्म व्यायाम, मंडूकासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम, कपालभाती, शीतली, मेडिटेशन आदींचा समावेश होता. यामध्ये शाळा, महाविद्यालये याबरोबरच इतर अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी निमाचे अध्यक्ष विनायक टेंभुर्णीकर यांच्यासह योगा प्रशिक्षक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आदी उपस्थित होते. प्रा.प्रशांत वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर वंदे मातरम् आणि हास्यासन नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments