Pandharpur Live: लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवायला गेलेल्या नवरदेवासह तिघांचा अपघाती मृत्यूसोलापूर – लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवायला गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याची दु:खद घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर बुधवारी (8 जून) रात्री एक वाजताच्या सुमारास घडली.

नवरदेवाच्या कारला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

नवरदेव दीपक बुचडे वय (29), आकाश साखरे (वय 28) आणि आशुतोष माने (वय 23) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-दुधनी रस्त्यावरील बिंजगेरच्या दर्ग्याजवळ हा सर्व भीषण प्रकार घडला आहे. याप्रकरणी दीपक यांच्या नातेवाईकांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक बुचडे याचे 18 जून रोजी लग्न होणार होते. त्यामुळे त्याची लग्नपत्रिका देवाच्या द्वारी ठेवण्यासाठी तो बुधवारी त्याच्या दोन मित्रांसह अक्कलकोटला निघाला होता. गाणगापूरच्या दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी जात असताना या तिघांवर काळाने घाला घातला.

गाणगापूरच्या दिशेनं जात असताना अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दीपकच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या घटनेत दीपक आणि त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments