स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षारंभी विशेष कार्यक्रमाचे आयोजन


हिवरे बाजारचे कृषीतज्ञ पद्मश्री पोपटराव पवार करणार विशेष मार्गदर्शन

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील माळरानावर २४ वर्षांपूर्वी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. तेंव्हापासून यशाचा वारू चौफेर उधळत असून संस्थेला यंदा २४ वर्षे पूर्ण होत असून २५ व्या वर्षात पदार्पण होत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षारंभाचे औचित्य साधून दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी संस्था परिसरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार (जि.अहमदनगर)चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील ब्रिगेडीअर बोधेज् करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे हे असणार आहेत. यावेळी स्वेरी परिवार व स्वेरीचे हितचिंतक, पालक व विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         येत्या बुधवारी, दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडे दहा वाजता स्वेरीमध्ये होणाऱ्या या विशेष कार्यक्रमास राज्यात विशेषतः ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने विविध यशस्वी उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले उपक्रमशील शेतकरी व माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे ‘कृषी आधारित ग्रामविकासात युवकांचे योगदान व पाणी व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 'स्वेरी' या संस्थेत आत्तापर्यंत अभियांत्रिकी (पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी), फार्मसीचे (पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी), पदव्युत्तर पदवीचे एमबीए व नुकतीच मान्यता मिळालेले एमसीए हे अभ्यासक्रम असलेली महाविद्यालये यशस्वीरित्या सुरु आहेत. स्वेरी ही विद्यार्थी व पालकांच्या विश्वासावर सुरू झालेली शैक्षणिक संस्था असून आज विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाबरोबरच उत्तम गुणवत्ता देण्याकडे सातत्याने स्वेरीचा कल असतो. अडचणी, परिश्रम आणि जिद्दीने सुरू झालेल्या या स्वेरी संस्थेकडे पाहिल्यास आज शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड यशस्वी झालेली संस्था म्हणून सर्वजण आदराने पाहतात. सन १९९८ साली १६० विद्यार्थी, आठ शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सुरू झालेली ही संस्था आज २५ व्या वर्षात पदार्पण करत असताना तब्बल चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, सुमारे २५० शिक्षक आणि सुमारे १८० शिक्षकेतर कर्मचारी अशा अफाट आकडेवारीनिशी वाटचाल करीत आहे. यशस्वी वाटचाल करताना विविध पात्र कोर्सेसना एनबीए व अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकचे ‘ए-प्लस’ अशी विविध सर्वोत्तम मानांकने मिळाली आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष एन.एस. कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या गठीत झाल्या असून त्यादृष्टीने अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. स्वेरी परिवारातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, होणार असून यासाठी सायंकाळी 'जागर माय मातीचा' या काव्यवाचन/काव्यगायन कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. त्यामुळे स्वेरी कॅम्पसमध्ये सर्वत्र कामांची लगबग दिसत आहे.

Post a Comment

0 Comments