स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विभागात  'इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल रोबोटिक्स’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात  मार्गदर्शक म्हणून स्वेरी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी व सीडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे ॲप्लिकेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अमर कचरे हे उपस्थित होते.             प्रारंभी प्रास्ताविकात प्रा.धनराज डफळे यांनी या मार्गदर्शन सत्राचा हेतू स्पष्ट केला. स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागातील ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात आणि यासाठी कोणकोणती तयारी केली जाते? याबाबत सविस्तर माहिती देऊन कंपनीमधील तज्ञांकडून घेतलेले मार्गदर्शन कसे उपयोगाचे ठरते यावर प्रकाश टाकला. तसेच शिक्षण आणि इंडस्ट्रीज या दोन्ही मधला दुवा म्हणजेच ‘मार्गदर्शन सत्र’ असे सांगून  बहुमोल मार्गदर्शन केले. 

अभियंता कचरे यांनी पुढे रोबोटिक्स म्हणजे काय हे सांगून इंडस्ट्रियल रोबोटिक्स चे विविध प्रकार, रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रातील उपयोग सांगून रोबोट डिझाईनिंग आणि कंट्रोलिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर तसेच या क्षेत्रामध्ये असलेल्या नोकरीच्या विविध संधी यावर विचार व्यक्त केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. या मार्गदर्शन सत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे मार्गदर्शन सत्र यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले. मार्गदर्शन सत्राच्या समन्वयक प्रा.माधुरी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.विजय सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments