स्वेरीचे प्रा.श्रीकृष्ण भोसले यांना पीएच.डी.प्राप्त


पंढरपूर- येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. श्रीकृष्ण बाबासाहेब भोसले यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ‘सिंथेसिस ऑफ लीन स्टील पावडर मेटलर्जीकल कॉपोनंटस फॉर मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड मशीनॅबिलीटी बिहेविअर ’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध आसाम राज्यातील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजी, सिल्चर मध्ये सादर केला होता.  पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात त्यांचा जेष्ठ विचारवंत व व्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.           संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व डॉ. अमितावा रे व डॉ. सुमित भौमिक यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली प्रा.भोसले यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना आई, वडील, भावंडे, स्वेरी अभियांत्रिकी मध्येच कार्यरत असणाऱ्या पत्नी प्रा.सौ. सुप्रिया भोसले यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. भोसले यांनी आवर्जून सांगितले. 

           स्वेरी या संस्थेच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवाती पासूनच स्वेरीमध्ये संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. आज स्वेरी  मधील सुमारे ३२  प्राध्यापक पीएच.डी. धारक आहेत आणि सुमारे ३० पेक्षा अधिक प्राध्यापक पीएच.डी. प्राप्त करण्याच्या मार्गावर आहेत. स्वेरीला आतापर्यंत रु. १० कोटी पेक्षा जास्त संशोधन निधी प्राप्त झालेला असून रु. १.७५ कोटी एवढी कन्सल्टन्सीची रक्कम  प्राप्त झाली आहे. स्वेरीकडून आतापर्यंत एकूण २५ पेटंट्स फाईल करण्यात आले असून एकूण ७४८ पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. स्वेरीमध्ये संशोधनास असणारे पूरक वातावरण, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे सरांचे विशेष मार्गदर्शन, विविध संस्थासोबत असणारे  सामंजस्य करार, उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधनपर प्रयोगशाळा  या सर्व बाबींमुळे स्वेरीतील वातावरण हे संशोधनास अतिशय  पोषक बनले  आहे आणि या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीतील पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांची संख्या वरचेवर वाढत आहे.

सत्कार प्रसंगी प्रा.विजयकुमार वाघमोडे, प्रा. आबासाहेब सलगर, विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. भोसले हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या १४ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून त्यांचे अनेक शोध प्रबंध प्रकाशित झाले आहेत. अलीकडेच त्यांनी  हैद्राबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभाग घेवून आपला शोधनिबंध सादर केला होता. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. भोसले यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments