फी ची विचारणा केल्याने वडिलांना सॉरी मेसेज , विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

 

शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दिलेल्या पैशांचे काय केले याचा जाब आई-वडील विचारत असल्याने त्यांना आता काय उत्तर द्यायचे, या नैराश्येतून केटीएचएम महाविद्यालयातील टी.


वाय. बी. कॉमच्या विद्यार्थ्यांने वसतिगृहातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.22) सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या वडिलांना 'सॉरी' असा मेसेज पाठवला. गौरव रमेश बोरसे (वय 21, रा.डांगसौंदाणे, ता.बागलाण) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव हा केटीएचएम महाविद्यालयात टी.बी. बी. कॉमच्या तिसर्‍या वर्षामध्ये होता. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये राहत होता. 


शिवाय, तो सीए असलेल्या मामांकडे पार्टटाईम नोकरीसुद्धा करत होता. सोमवारी रात्री १० वाजेदरम्यान वसतिगृहामधील मित्रासोबत जेवण केले. तो रुमध्ये एकटाच राहत होता. मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान त्याच्या रूमसमोरील मित्र इस्त्री मागण्यासाठी गौरवच्या रुमजवळ आले. 


त्यावेळी त्याला रूमचा दरवाजा बंद दिसला. शिवाय, त्याचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले. शेवटी मित्रांनी खिडकीच्या फटीतून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही बाब विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील प्रमुखांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता त्याने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले.


 गौरवने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी नाशिक गाठले. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात त्याच्या आईसह कुटुंबियांनी हंबरडा फोडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments