सोलापूर: शासकीय पॉलिटेक्निकच्या इमारतीची दुरवस्था

 

शहरातील शासकीय पॉलिटेक्निकची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महाविद्यालयची मुख्य इमारत जीर्ण झाली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.


वस्तीगृहामध्ये विषारी साप, विंचवांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोलापूर शहरातील 1956 मध्ये स्थापन झालेले राज्यातील सर्वात जुने शासकीय पॉलिटेक्निकची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. इमारतीचे स्लॅब खराब होऊन पावसाळ्यात पावसाचे पाणी वर्गात शिरत असते. दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने वस्तीगृहामध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांना अक्षरशः रोज जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. महाविद्यालयाच्या 33 एकर परिसरात सर्वत्र जंगलाचे स्वरूप निर्माण झाले आहे. जागोजागी काटेरी वृक्ष, गवत, झाडी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घ्यावे लागत आहेत. 


वस्तीगृहामध्ये विद्युत वाहिनी उघड्यावर आहेत. वस्तीगृहामध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलच्या टॉर्चचा अभ्यास करताना वापरा करावा लागतोे. शौचालयामधील एकाही बाथरूमला दरवाजा नाही. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नाइलाजवस्तव मुलांना पहाटे व रात्री मोकळ्या जंगलामध्ये प्रसाधनास जावे लागते. स्वच्छतेअभावी वाढलेल्या जंगलामुळे विषारी विंचू, साप यांसारख्या सरपटणार्‍या प्राण्यांचा वस्तीगृहात वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाथरूममध्ये, मुलांच्या रूममध्ये, कपड्यांमध्ये दर दोन दिवसाला साप आढळतो. वस्तीगृहाचे दारे, खिडक्या मोडकळीला आले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या असून फुटलेल्या काचांचे खच जागोजागी पडले आहेत.


 वस्तीगृहाचे स्लॅब पावसाळ्यात गळते. अशाच परिस्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणासाठी राहावे लागत असल्याची व्यथा वस्तीगृहातील विद्यार्थ्याकडून दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.


मुलींच्या वस्तीगृहामध्ये देखील पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय नसल्याने मुलींना वेळी अवेळी पिण्याच्या पाण्यासाठी वस्तीगृहापासून पाचशे मिटर लांब मुख्य इमारतीपर्यंत पायपीट करावी लागतेे. 

मुलींच्या वस्तीगृहामध्ये सहा बाथरूम पैकी फक्त एकच बाथरूम वापरण्यास देण्यात आल्या असून यामुळे बाथरूमला जाण्यासाठी मुलींना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वस्तीगृहातील एका विद्यार्थिनीने सांगितले.

शासकीय पॉलिटेक्निकमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून या ठिकाणी बाहेरील व्यक्ती कोणी आले कोणी गेले याची साधी नोंददेखील घेण्याची तसदी येथील सिक्युरिटीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तींकडून घेतली जात नसल्याचे रजिस्टर पाहणीतून दिसून आले. 


सायंकाळी सातनंतर मुख्य इमारत वगळता इतर परिसरात भयाण शांतता असते. रात्री अपरात्री मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने वस्तीगृहाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी विद्यार्थिनींकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments