ट्रकचालकासह दोघांवर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला , 50 हजार लुटले

 

सराईत चोरट्यांनी ट्रकमध्ये झोपलेल्या चालकासह दोघांवर जीवघेणा हल्ला करून त्यांच्याकडील 50 हजारांची रक्कम लुटल्याची घटना पुलाची शिरोली येथील पेट्रोल पंपावर शनिवारी मध्यरात्री घडली.


चोरट्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात सोपान विठ्ठल केंद्रे (वय 42, रा. सुलाळी, ता. जळकोट, जि. लातूर) व माधव पिराजी शिंदे (35, डोंगर केताल, लातूर) जखमी झाले.

सोपान केंद्रे यांनी चोरट्यांशी प्रतिकाराचा प्रयत्न करताच पोटावर, छातीवर धारदार चाकूचे वार करण्यात आले. माधव शिंदे यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा करून त्यांना बेशुद्ध करण्यात आले. रक्कम लुटून जाताना चोरट्यांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमींना मध्यरात्री शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ट्रकचालक केंद्रे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.केंद्रेव माधव शिंदे ट्रकमधून कोळसा घेऊन शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात आले होते. रिकामा ट्रक रात्री शिरोली पुलाची येथील पेट्रोल पंपावर थांबविला. रात्री ट्रकमध्ये विश्रांती घेऊन सकाळी लवकर नागपूरला जाण्याचा त्यांचा बेत होता. यावेळी त्यांच्याकडे 50 हजारांची रोकडही होती. मध्यरात्री अडीच वाजता तिघा चोरट्यांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश केला. केंद्रे व शिंदे यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारला. केंद्रे झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या गळ्याजवळ चोरट्यांनी धारदार चाकू लावला. यावेळी प्रतिकाराचा प्रयत्न होताच चोरट्यांनी चाकूने त्यांच्यावर खुनी हल्ला करून घायाळ केले. केंद्रे यांच्याजवळील 50 हजारांची रोकड व अन्य साहित्य हिसकावून चोरट्यांनी अंधारातून पलायन केले. जाताना शिंदे यांनाही मारहाण केली.

चोरट्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या केंद्रे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील अन्य ट्रकचालकांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या केंद्रेंसह शिंदे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. जखमी चालक केंद्रेंवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments