अनेक मराठी कलाकार मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. काहींनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे तर काही लवकरच करणार आहेत.
‘रुंजी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत पल्लवीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याचप्रमाणे ‘बापमाणूस’ आणि ‘अग्निहोत्र २’ या मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘छोरी २’ या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात गश्मीर महाजनीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ते अभिनेत्री नुसरत भरूचाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसतील. हा चित्रपट एक स्त्रीप्रधान आणि सस्पेन्स चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. नुकतीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्याचा पल्लवीला प्रचंड आनंद झाला आहे. याचं तिने जोरदार सेलिब्रेशन केलं.
दरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पल्लवीने नुकताच तिचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. यात ती एका पबमधील बार काउंटरवर चढून दिलखुलासपणे नाचताना दिसत आहे. तिचा हा अंदाज पहिल्यांदाच पहिल्याचं सांगत तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसंच मनोरंजन सृष्टीतीलही काही कलाकारांनीही तिचा हा अंदाज आवडल्याचं कमेंट्स करत सांगितलं आहे.
0 Comments