कैद्याच्या पत्नीवर शारिरीक अत्याचार, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

 

नागपूर : सर्वसामान्यांकडून वैद्यकीय तज्ज्ञांकडे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते, मात्र एका डॉक्टरने चक्क एका महिलेवर शारीरिक अत्याचार करीत हा समज मोडीत काढला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित महिला ही खुनाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी आहे. सदर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली.

डॉ. गौरव रमेश डोर्लीकर (वय ३५, गुरुदेव नगर, नंदनवन) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. ३६ वर्षीय महिलेचे लग्न झाले असून, तिला मूलदेखील आहे. तिचा पती अनेक वर्षांपासून खुनाच्या आरोपात मध्यवर्ती कारागृहात आहे. 


एका नातेवाइकाच्या माध्यमातून ती क्युनेट बिझनेसमध्ये आली व तिची डॉ. गौरव डोर्लीकरसोबत ओळख झाली. त्याचेदेखील लग्न झाले आहे. डोर्लीकरने तिला आपल्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवीत तिला घटस्फोट फाईल करण्यास सांगितले. त्याने स्वत:देखील पत्नीसोबत काडीमोड घेऊन महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. संबंधित महिलेने घटस्फोटासाठी अर्जदेखील दिला.

यानंतर त्याने तिला सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटोल मार्गावरील एका प्लॅटमध्ये तिला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १० जानेवारी २०२२ पासून वर्षभर तो तिला तेथे घेऊन गेला व वारंवार तिच्यावर अत्याचार केला. 


महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तिला नकार दिला. मी कुठल्याही स्थितीत लग्न करणार नाही, असे त्याने तिला म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी डॉ. डोर्लीकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून फोनदेखील स्वीच ऑफ आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments