आधी दोन मुलांना ढकललं नंतर स्वतः घेतली गोदावरीत उडी .... आईचं धक्कादायक पाऊल

तेलंगणातील गोदावरी नदीत सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांना नदीत ढकलून, नंतर स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.


माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोहणाऱ्यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. निर्मल जिल्ह्यातील बासर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिला मानसा (वय 27) यांनी प्रथम तिचा मुलगा बालादित्य (8 वर्ष) आणि मुलगी नवश्री (7 वर्ष) यांना नदीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही उडी मारून आत्महत्या केली.


घाटाजवळ पोलिसांना शाळेचे दप्तर आणि रिकामे टिफिन बॉक्स सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसा (वय 27) हिचे महबूबनगर जिल्ह्यातील कोसगी येथील व्यंकटेश्वरसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या जोडप्याला बालादित्य (8) आणि भाव्या श्री (7) ही दोन मुले झाली. व्यंकटेश्वरच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कुटुंब पाच वर्षांपूर्वी निजामाबादला स्थलांतरित झाले.


येथे ते मानसाचा भाऊ संदीपकडे राहात होते. दरम्यान, व्यंकटेश्वरचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मानसाने भाड्याने घर घेऊन निजामाबाद येथील एका शॉपिंग मॉलमध्ये काम सुरू केले. आपल्या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवत होती. नेहमीप्रमाणे मानसाने तिच्या भावाला सांगितले की ती 23 जानेवारीला शॉपिंग मॉलमध्ये नोकरी करण्यासाठी जात आहे. तिने आपल्या मुलांना शाळेतून घेतलं आणि तिघेही बसने निर्मल जिल्ह्यातील बासर या प्रसिद्ध मंदिरात पोहोचले.

ते गोदावरी नदीच्या काठी गेले. मानसाने जेवणाचे डबे उघडले आणि आपल्या मुलांना खाऊ घातलं. त्यानंतर त्यांच्या चपला तिथेच शाळेच्या दप्तरांच्या बाजूला ठेवले.या तिघांना पाहणाऱ्या लोकांना वाटले की ते पवित्र स्नान करण्यासाठी नदीत जात आहेत.

पण, घडलं उलटच. मानसाने नदीत उडी मारण्यापूर्वी तिच्या दोन मुलांना गोदावरीत फेकून दिले. या तिघांना नदीत बुडताना पाहून काही यात्रेकरुंनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

मुलांच्या दप्तरातील वहीत मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे यात्रेकरूंनी या घटनेची माहिती नातेवाइकांना दिली. मुधोळे सर्कलचे पोलीस निरीक्षक विनोद रेड्डी आणि उपनिरीक्षक महेश यांनी घटनास्थळ गाठून यात्रेकरूंकडून माहिती घेतली. एसआय महेश यांनी सांगितले की, मानसाचा मोठा भाऊ संदीपने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एकल आईने आर्थिक अडचणींमुळे दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments