सोलापूर: करणी दुर करण्याच्या बहाण्याने दागिने पळवले, भोंदूबाबाला अटक

 

सोलापूर: तुमच्यावर करणी केलीय, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सोलापुरातील  एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय.


आरोपीकडून पोलिसांनी दागिने देखील हस्तगत केले आहेत. हुसेनसाब मखदुमसाब नदाफ आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्याविरोधात भांदवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणातील फिर्यादी हे कर्नाटकातील इंडी ते सोलापूर असा रेल्वेमधून प्रवास करत होते. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे पती मुलाचे लग्न होत नसल्यासंदर्भात बोलत होते. त्यावेळी शेजारी बसलेल्या आरोपी नदाफ याने आपण बाबा असून मुलाचे लग्न होण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच फिर्यादी यांना नाव न सांगात केवळ मोबाईल नंबर लिहून दिला. फिर्यादींनी आरोपीवर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी घरी बोलावले. घरी आल्यानंतर आरोपीने घरावर करणी झाल्याचा कारण सांगितलं. ही करणी दूर करण्यासाठी मोठी पूजा मांडावी लागेल असे सांगितले.

पूजेसाठी 15 हजार रुपये आणि दागिने मागितले आणि...

दुसऱ्या दिवशी फिर्यादींना बोलावून पूजेसाठी 15 हजार रुपये खर्च आणि स्वत: वापरलेले दागिने लागतील असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण देखील घेतले. दुसऱ्या दिवशी शहरातील एका मंदिरात पुजेसाठी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी फिर्यादींनी बाबास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी आरोपीवर भांदवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


24 तासात आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या

आरोपी भोंदूबाबाचे नाव, पत्ता किंवा कोणतीच माहिती फिर्यांदीना नव्हती. केवळ मोबाईल नंबर या बाबाने फिर्यादींना दिला होता. त्याआधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम राजपुत यांनी तांत्रिक माहितीचा वापर करत तपास सुरु केला. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याची अधिक चौकश केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुल केले. शिवाय सोन्याचे गंठण दक्षिण सोलापुरातल धोत्री येथील त्याच्या मावशीच्या घराच्या शेजारी असणाऱ्या विटभट्टीवर ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी या ठिकाणी जाऊन सोन्याचे गंठण देखील हस्तगत केले.

ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत, पोलिस कर्मचारी राकेश पाटील, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आवेज बागलकोटे, शैलेश स्वामी, काशीनाथ वाघे, शंकर जाधव यांनी ही कामगिरी केली आहे.


Post a Comment

0 Comments