खळबळजनक: मेकअपसाठी गेली होती नवरी, पोलिसाने ब्युटी पार्लरमध्ये घुसून झाडली गोळी

 

पाटणा : लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी अतिशय खास असतो. मात्र कधीकधी याच दिवशी अशा काही घटना घडतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक घटना आता बिहारच्या मुंगेरमधून समोर आली आहे.


इथे लग्नासाठी तयार होण्याकरता ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या वधूवर बिहारच्या पोलीस हवालदाराने गोळी झाडली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळी झाडल्यानंतर नवरीला जखमी अवस्थेत स्थानिक सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रविवारी वधूचं लग्न होतं. त्यामुळे ती तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी झाडणारा हवालदार तरुणीचा प्रियकर होता. प्रेयसीच्या लग्नामुळे तो भडकला होता.हे प्रकरण कस्तुरबा वॉटर चौकातील ब्युटी पार्लरमधील आहे. पोलिसांनी सांगितलं की, 26 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकर हवालदाराने गोळी झाडली. गोळी तरुणीच्या डाव्या खांद्यावर लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

त्यानंतर हवालदाराने बंदूक स्वतःकडे वळवत गोळीबार सुरू केला. मात्र घाबरल्यामुळे त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडला. आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वीच ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पकडलं. पण कसा तरी अमन त्याच्या तावडीतून सुटला आणि पळून गेला.

त्याचवेळी इतर लोकांनी नवरीला रुग्णालयात नेलं. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी कॉन्स्टेबल अमन कुमारचा शोध सुरू केला. मुंगेरचे डीएसपी राजेश कुमार यांनी सांगितलं की, आरोपी अमन बिहार पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि तो पाटणा येथे तैनात आहे.

तो मूळचा महेशपूर गावचा रहिवासी आहे. त्याचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल. दुसरीकडे, ब्युटी पार्लरच्या मॅनेजर निधीने सांगितलं की, रविवारी संध्याकाळी नवरी तिच्या लग्नाच्या तयारीसाठी तिथे आली होती.

रात्री साडेआठच्या सुमारास ब्युटी पार्लरमधील लोक तिला तयार करत असताना अचानक कॉन्स्टेबल अमन तिथे आला. नवरीला पाहताच त्याने तिच्यावर गोळीबार केला. त्यावेळी नेमकं काय चाललं आहे, ते कोणालाच समजलं नाही. त्यानंतर हवालदाराने पिस्तुल स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तो गोळीबार करणारच होता, इतक्यात त्याच्या हातातून पिस्तुल खाली पडला.


Post a Comment

0 Comments