पुणे-: हिंगोली जिल्ह्यातील धोत्रा येथील ह.भ.प. हरिभाऊ राठोड यांची पाण्यावर तरंगण्याची चलचित्रफीत विविध समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. त्यांना सिद्धी प्राप्त असल्यामुळे ते पाण्यावर तरंगत असल्याचा दावा या चलचित्रफीतच्या माध्यमातून करण्यात आला. त्याचे काहींनी समाजमाध्यमावर जाहीर समर्थन केले. त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धीच्या जोरावर ते पाण्यावर तरंगू शकतात, असा समज समाजात पसरवल्या गेला आहे.
पाण्यावर तरंगत राहणे, हा चमत्कार ह.भ.प. हरिभाऊ राठोड सिद्धी प्राप्त केल्यानेच करू शकतात, हा दावा पूर्णतः चुकीचा आहे.
पाण्यावर तरंगणे हे कौशल्य सिद्धीप्राप्त केल्याने नव्हे तर नियमित त्याप्रकारे पोहण्याच्या सरावाने विकसित करता येते. ज्याचे प्रात्यक्षिक रविवार, दि. २१ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना टिळक जलतरण तलावात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करून दाखविले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेपूर्वी पाण्यावर तरंगण्याच्या आयोजित केलेल्या भंडाफोड प्रात्यक्षिकात पुण्यातील जयंत विलायतकर व त्यांचा मुलगा हर्ष विलायतकर यांनी पाण्यावर तरंगून दाखविले.
अ.भा. अंनिस कुठल्याही देवा-धर्माला विरोध करत नाही. संत, महापुरुषांचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे आणि अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे, हाच चळवळीचा उद्देश आहे. कोणतीही व्यक्ती चमत्कार करू शकत नाही. चमत्कार सिद्ध करा आणि ३० लाख रूपये मिळवा, हे आव्हान अ.भा. अंनिसद्वारे मागील ४० वर्षांपासून भारतासह जगातील सर्व स्वयंघोषित बाबाबुवा, देव्या, मांत्रिक, तांत्रिकांना देण्यात येत असून आजतागायत हे आव्हान कोणीही लेखी स्वरूपात अधिकृतपणे स्वीकारून सिद्ध करू शकले नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आजपर्यंत कोणत्याही संतांने चमत्कार केला नाही आणि चमत्काराचे समर्थनही केले नाही. याउलट संतांनी चमत्काराला आपल्या साहित्यातून आणि कृतीतून विरोधच केल्या आहे. तोच विचार अ.भा.अंनिस समाजात रुजवीत आहे.
जादुटोणाविरोधी कायद्यातील अनुसूची २ नुसार तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, कायद्याने गुन्हा आहे. असे घडत असल्यास पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडूनद्वारे पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या पत्रपरिषदेला प्रात्यक्षिक सादर करणारे जयंत विलायतकर यांच्यासह अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी खानविलकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद बागवे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संध्या बागवे, युवा शाखेच्या राज्य सचिव हर्षाली लोहकरे, ठाणे जिल्हा महिला शाखा संघटक नीता डुबे, यवतमाळ जिल्हा शाखा संघटक बंडू बोरकर, अकोला जिल्हा शाखा संघटक चंद्रकांत झटाले , पुणे जिल्हा शाखा संघटक नितीन सिरसाट, सचिव सुनील भालेराव, सहसचिव भारत कांबळे, आरती जगताप , गोविंद एकबोटे, यांची उपस्थिती होती.
......... ....
पंकज वंजारे ,
महाराष्ट्र राज्य युवा संघटक, अ.भा.अंनिस
9890578583
0 Comments